मुंबई : आधीच महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होत नसताना आता यात मनसेची एन्ट्री होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. मनसे राज अध्यक्ष आणि त्यांचे पूत्र अमित ठाकरे सोमवारी दिल्लीत होते. त्यांनी या संदर्भात भाजपतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्याचं समजते.
महायुती जाताना मनसेने किमान दोन जागांची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईतून लढण्यासाठी मनसेने तयारी केली आहे. दक्षिण मुंबईतून सध्या उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. या जागेसाठी शिंदे गटही आग्रही असल्याची माहिती आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना या जागेवरुन लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे भाजपचे मिलिंद नार्वेकर या भागात फिरत असल्याची आणि आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे भाजपकडून ही जागा मनसेसाठी सोडली जाणार का? असा प्रश्न आहे.
चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली. लोकसभा, विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी महायुतीला राज ठाकरेंच्या मदतीची आवश्यकता वाटत आहे. मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी या तीनपैकी किमान २ लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. या तिन्ही जागा शिंदे सेनेकडे आहे. त्यापैकी एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याला संमती दिल्याची माहिती आहे.
मात्र दक्षिण मुंबईसाठी भाजप आग्रही आहे, दुसरीकडे शिंदे गट नाशिक सोडणार नाही. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होऊ शकतं. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होऊ शकते.