मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन संभ्रम अद्यापही कायम आहे. शिवतीर्थावर पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजपा चलेजावचा नारा मविआच्या नेत्यांनी दिलाय. वंचितचे प्रकाश आंबेडकरही इंडिया आघाडीच्या व्यापसीठावर दिसले.निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, इंडियाच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फुटला असला तरी जागावाटपाचं काय, असा प्रश्न कायम आहे. महाविकास आघाडीत वंचित येणार की नाही, हा प्रश्न असतानाच, मविआतच सहा जांगवरुन वाद सुरु आहे.
मविआत कोणत्या जागांवरुन अडलं जागावाटप?
- सांगली
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस
ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा
काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह
काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांची आग्रही भूमिका
कोल्हापूर काँग्रेसला गेल्यामुळं ठाकरेंची शिवसेना आग्रही
२. उत्तर पश्चिम मुंबई
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस
ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर
काँग्रेसकडून संजय निरुपम मतदारसंघासाठी आग्रही
३. भिवंडी
काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चुरस
राष्ट्रवादीकडून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रेंचं नाव आघाडीवर
काँग्रेसही भिवंडी मतदारसंघासाठी आग्रही
सुरेश टावरे यांच्यासह काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक
४. हिंगोली
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीचा आग्रह
ठाकरेंच्या शिवसेनेचाही दावा
नागेश आष्टीकर, संदेश देशमुख, सुभाष वानखेडेंसह इतर इच्छुक
५. जालना
जालन्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस
शिवसेनेकडून शिवाजीराव चोथे, डॉ. संजय लाखेंच्या नावाची चर्चा
काँग्रेसकडून कल्याण काळे, राजाभाऊ देशमुख यांची नावं
- हातकणंगले
राजू शेट्टींना मविआ पाठिंबा देणार का याकडे लक्ष
ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉ. सुजित मिणचेकरांची चर्चा
मविआनं उमेदवार दिल्यास शेट्टी स्वतंत्रपणे रिंगणात
रामटेकचा वाद सुटल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मात्र या सहा जागांचं काय होणार, या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाहीये.
ठाकरेंचा प्रचार सुरु, काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थता?
हा तिढा असतानाच, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मविआत येणार का, याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. वंचितला 4 जागा सोडण्याची तयारी मविआनं दाखवली असली, तरी अद्याप याबाबत आंबेडकरांनी निर्णय जाहीर केलेला नाहीये. ते मुंबईत इंडिया आघाडीच्या सभेत उपस्थित राहिले पण आघाडीत प्रवेश करण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आणि काही उमेदवारांची घोषणाही केलीय.
त्यामुळं काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्यात लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
हेही वाचा:मनसे महायुतीच्या वाटेवर? किमान 2 जागांची अपेक्षा, पिता-पूत्र दिल्लीत