मुंबई– मनसे महायुतीत जाणार की नाही, याबाबतची स्पष्टता काही तासांत येईल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलंय. राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत, ते काही तासांत त्यांची भूमिका मांडतील, त्यातून सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही संदीप देशपांडे म्हणालेले आहेत. बाळा नांदगावकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेले तर आनंदच होईल, असंही देशपांडे यांनी स्पष्ट केल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागा मनसेला मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र या जागी भाजपानं कमळावर उमेदवार उभे करावेत, अशी अट घातल्याचंही सांगण्यात येतंय. यावर अशी कोणतीही अट असल्याची माहिती नाही, असंही देशपांडे म्हणालेले आहेत.
राज ठाकरेंचा निर्णय मान्य- देशपांडे
राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत हे खरं आहे. ते तिथं कुणाला भेटतील, हे सगळं काही तासांत कळेल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो ही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. राज ठाकरे जो निर्णय़ घेतील तो महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या हिताचा असेल. त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे यापुढंही मनसेचे नेते आणि पदाधिकारी वाटचाल करतील असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंच्या आदेशामुळं कधी यश आलं, किंवा अपयश आलं तरी मनसैनिक राज यांच्या आदेशाप्रमाणेच वाटचाल करतील, असंही देशपांडे म्हणालेले आहेत.
राजकारणाचा चिखल ठाकरेंनी केला
2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते. मात्र निकालांनंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली, तिथून राज्याच्या राजकारणात चिखल सुरु झाला, असंही संदीप देशपांडे म्हणालेले आहेत.
हेही वाचाःइलेक्टोरल बाँड प्रकरणाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद? भाजपासह इंडिया आघाडीतील पक्षही अडचणीत?