मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं वंचितला अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे.
मविआचा काय अल्टिमेटम
मविआशी चर्चेत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं आघाडी होत नसल्याचं सांगण्यात येतंय. मविआतील सगळ्या पक्षांनी निवडणुकांनंतर भाजपासोबत जाणार नाही, याचं लेखी प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी आंबेडकरांनी केलेली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी मविआतील घटक पक्ष तयार नसल्याची माहिती आहे. मविआनं ४ जागा वंचितला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र याबाबत आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. वंचितला राज्यात ६ ते ७ जागा हव्या आहेत. लवकर निर्णय झाला नाही तर वंचित स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा सोमवारी आंबेडकरांनी दिला होता.
मविआत जागावाटपाचे दोन फॉर्म्युले
सध्या मविआनं वंचितची भूमिका पाहता दोन फॉर्म्युले निश्चित केलेले आहेत. पहिल्या फॉर्म्युल्यात वंचित आघाडीसोबत आली नाही तर ठाकरेंची शिवसेना 22, काँग्रेस 16 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार आहे.
वंचित सोबत आल्यास ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 15 तर शरद पवार राष्ट्रवादी 09 जागांवर लढेल. चार जागा वंचितला सोडण्यात येणार आहे.
आता आंबेडकरांच्या कोर्टात बॉल
आता या सगळ्यात प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात. आज दिवसभरात ते निर्णय घेतात का, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. मविआ आणि प्रकाश आंबेडकर यांचा एकमेकांवर अविश्वास असल्याचं स्पष्ट दिसतंय. अशा स्थितीत आंबेडकर मविआत जातील का, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
कुठलाही अल्टिमेटम नाही- वंचित
महाविकास आघाडीने कुठलंही अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीला दिलेलं नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. असं कुठलंच कम्युनिकेशन महाविकास आघाडीने आमच्याशी केलेलं नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही. असं वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केलेलं आहे.
हेही वाचाःराज ठाकरे महायुतीत आले तर कुणाला फायदा? मनसेच्या वाट्याला काय?