मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता आहे.
ठाकरे विरुद्ध ठाकरे
मविआच्या वतीनं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात जोमानं केलेली दिसतेय. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना दिसतायेत. अशात राज ठाकरे महायुती सोबत आल्यास उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देणारा तोडीचा नेता महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यासह शहरी भागात लाभ
मंबई, ठाण्यासह शहरी भागात शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसमोर ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाचा फायदा महायुतीला मतदानात होण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबतच, मनसेमुळेही ठाकरेंच्या शिवसेनेचं मतविभाजन करणं भाजपाला शक्य होईल.
मुंबई महापालिका निवडणुकांतही होणार फायदा
आगामी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांतही भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि मनसे या युतीच्या माध्यमातून मुंबई महापालिका जिंकता येतील, असा महायुतीचा प्रयत्न राहील.
मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्ष असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता उलथून लावण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी केलेली आहे.
हिंदुत्वावर मतविभाजन टाळणं शक्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचा दौरा करुन, काही मतदारसंघांची चाचपणी केली होती. मनसेनं उमेदवार रिंगणात उतरवले असते तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता होती. त्यामुळं हिंदुत्वाच्या मतांचं मतविभाजन टाळण्यासाठीही या निर्णयाचा फायदा महायुतीला होणार आहे.
पवार विरुद्ध पवार प्रमाणेच ठाकरे विरुद्ध ठाकरे
बारामती लोकसभा मतदारसंघातील यंदाची लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी कुटुंबातच होताना दिसतेय. त्याचप्रमाणे मुंबई, ठाण्यात लोकसभेची लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःवंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..