मुंबई- एकीकडे राज ठाकरे दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेलेले असताना, दुसरी एक मोठी राजकीय घडामोड मुंबईत घडताना पाहायला मिळतेय. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता प्रिया दत्तही महायुतीत सामील होतात का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळणार?
प्रिया दत्त या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघआतून 2009 साली निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रिया दत्त फारशा काही सक्रिय नव्हत्या. बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर, प्रिया दत्त या महायुतीत येऊ शकतील अशी चर्चा सुरु झाली होती.
प्रिया दत्त या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. असे झाल्यास उत्तर मध्य मुंबईतून किंवा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दोन्ही मतदारसंघात सध्या काय स्थिती?
उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन या दोन टर्म खासदार आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. या मतदारसंघातून सध्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे त्यांचा मुलासमोर उभं राहण्याची शक्यता दिसत नाहीये. त्यामुळं या मतदारसंघातून प्रिया दत्त उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
तर उत्तर मध्य मुंबईतून अभिनेता गोविंदा याला उमेदवारी काँग्रेसकडून देणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला सोडून या जागेवरुनही प्रिया दत्त या महायुतीच्या उमेदवार असतील असंही सांगण्यात येतंय.
हेही वाचाःमहाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?