मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही त्यांनी दिलाय. काँग्रेस सांगेल त्या सात जागांवर वंचित उमेदवार उभा करणार नाही, असं आंबेडकर यांनी जाहीर केलेलं आहे.
काय आहे आंबेडकरांच्या पत्रात?
१७ मार्च रोडी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत आपल्याला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. त्यावेळी विस्तृत संभाषण शक्य झाले नाही, म्हणून आपणास हे पत्र लिहित आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र राज्यात मविआ वंचितला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रण देत नाहीये. मविआच्या बैठका मात्र नियमित सुरु आहेत.
ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मविआच्या बैठकीत वंचित बाजू ऐकून घेण्यास नकार दिलेला आहे. मविआनं दिलेल्या या असमान वागणुकीमुळे वंचितचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे.
वंचितचा मुख्य अजेंडा हा देशातील लोकशाही विरोधी भाजपा- संघ विचारांच्या सरकारला पराभूत करणे आहे. त्यामुळं राज्यात केवळ काँग्रेसच्या सात जागांवर वंचित पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
मविआत काँग्रेसच्या वाड्याला आलेल्या कोणत्याही सात जागांची नावे काँग्रेसनं वंचितला द्यावीत. त्या जागावंर वंचितचा काँग्रेसच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा असेल. हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचा नाही तर आगामी काळात आघाडीसाठी हात पुढं करणारा आहे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.
वंचितच्या निर्णयानंतर मविआ काय करणार
प्रकाश आंबेडकरांनी केवळ काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानं आता मविआत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. या आंबेडकरांच्या पत्रावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःप्रिया दत्तही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? मुंबईच्या या मतदारसंघातून तिकिट मिळणार असल्याची चर्चा