X: @therajkaran
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात (Election Commission) गेला. त्यावर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) पक्ष आणि चिन्ह बहाल केले, आयोगाच्या या निर्णयावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासोबतच आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा असून दलबदलू आणि पक्षफुटीला प्रोत्साहन देणारा आहे, अशा शब्दात आयोगाला फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना बहाल करणाऱ्या निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला दिलेल्या निर्णयाला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या विशेष याचिकेवर जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस के. व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान खंडपीठाने 10 व्या अनुसूचीवर विशेष जोर दिला.
याचाच विचार करुन जस्टिस विश्वनाथन म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय संघटनात्मक ताकदीच्या आधारावर नाही. फक्त विधीमंडळ बहुमताच्या आधारावर आहे, यामुळे पक्ष फुटीला मान्यता दिली जात नाही का? हा निर्णय 10व्या अनुसूचीनुसार नाही. पक्ष कोणाचा हे विधीमंडळ बहुमताच्या आधारावर नाही तर संघटना कोणाच्या ताब्यात आहे, संघटनेचे बहुमत कोणाला आहे, यावर निश्चित झाले पाहिजे. हे जर तुम्ही करु शकत नसाल तर त्याचे योग्य समाधान काय आहे? असा सवाल न्यायालयाने आयोगाला केला.
तुम्ही पक्ष बदल कराल आणि नंतर येऊन पक्षाच्या चिन्हावर दावा सांगाल, आणि आयोग त्याला मान्यता देईल, ही मतदारांची थट्टा आहे, असे ताशेरे न्यायालयाने आयोगावर ओढले.
अखेर न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. न्यायालयाने शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दिले. पुढील आदेशात म्हटले की, अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह दिले जात आहे. मात्र पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह वापरताना शरद पवार गटाकडून याला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे डिस्क्लेमर देण्याचे निर्देश दिले. याआधी 14 मार्चला झालेल्या सुनावणीत जस्टिस सूर्यकांत आणि विश्वनाथन यांनी अजित पवारांना नवीन चिन्हाचा विचार करा, अशा सूचना केल्या होत्या.