महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमित ठाकरे असू शकतात मनसेचा लोकसभेचा चेहरा

दक्षिण मुंबईत ट्विस्ट अँड टर्न

X: @ajaaysaroj

मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला आता चोवीस तास उलटून गेले आहेत. महायुतीच्या डब्यांना मनसेचे (MNS) इंजिन लागणार का याची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी दक्षिण मुंबई ही एकमेव जागा जर मनसे लढलीच तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनाच उमेदवारी द्यावी अशी चाचपणी भाजप श्रेष्ठींनी केली असल्याचे समजते. या सल्ल्याने दक्षिण मुंबईत ट्विस्ट अँड टर्न निर्माण झाला असून जर दोन जागा मान्य झाल्यास नाशिक ऐवजी शिर्डी हा राखीव मतदारसंघ मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी लढवावा असाही प्रस्ताव भाजपने दिल्याची चर्चा आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील राज ठाकरे यांच्या मनसेची एन्ट्री अधिकृतपणे कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मराठीचा मुद्दा आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून उभा राहिलेला परप्रांतीय विरोध यामुळे राज ठाकरे हे संपूर्ण देशपातळीवर आक्रमक नेते म्हणून चर्चिले गेले. परप्रांतीय मुद्द्यांवर झालेल्या राष्ट्रीय चॅनेल्सच्या माध्यमातील बातम्यांतून राज यांना परप्रांतीय लोंढ्यांच्या आक्रमणांना महाराष्ट्रात थोपवणारा मराठी माणसाचा मसिहा असे प्रोजेक्ट केले गेले.

पण सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), ममता बॅनर्जी (Mamta Banerjee), शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बरोबर वाढलेली सलगी आणि काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी (NCP) यांच्यासह केलेल्या सत्तेच्या भागीदारीमुळे, त्यांची साथ केवळ स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कट्टर हिंदुत्ववादी जनतेच्या मनातून पार उतरले आहेत हे चाणाक्ष राज यांनी अचूक हेरले.

त्यानंतर त्यांनी मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा उचलत, महाआरतीचे आयोजन ठीकठिकाणी करत स्वतःला थेट हिंदुजननायक म्हणून देशपातळीवर पुढे आणले. एका उत्तर भारतीय बांधवांच्या मेळाव्यात जाऊन राज यांनी तिथे त्यांच्याशी संवाद देखील साधत आपण सर्वच उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही हा मेसेजही दिला. त्याचप्रमाणे आपली परप्रांतीय विरोधाची धार सौम्य करत हिंदुत्वाची शाल पांघरत भाजपला देखील योग्य तो निरोप पोहचवला.

महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर सातत्याने त्यांच्या विरोधात आघाडीवर रहात, राज यांनी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक मुद्द्यावर खासकरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली. ही सर्व मोडस ओपरेंडी उद्धव यांना नामोहरम करण्या बरोबरच भाजपला सहाय्य करणारी होती. ही सर्व क्रॉनोलॉजी लक्षात घेता त्यांचे पडणारे प्रत्येक पाऊल हे मनसेला भाजपच्या जवळ नेत होते याबद्दल शंकाच नाही. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशिष शेलार यांच्या बरोबर वाढलेल्या भेटीगाठी देखील हेच संदेश गेले अडीच तीन वर्षे देत होते. त्याचीच परिणती अखेर परवा दिल्ली येथे झालेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होती.

याआधी झालेल्या फडणवीस व विनोद तावडे यांच्या भेटीत राज यांनी मनसेला तीन जागा मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे समजते. मात्र तीन जागा देणे शक्य नाही , एक किंवा जास्तीत जास्त दोन जागांसाठी आपण केंद्रीय नेतृत्वाकडे शब्द टाकू, असे त्यांना या जोडगोळीने समजावले असेही म्हणतात. अंतिम शब्द हा अमित शाह, नरेंद्र मोदी यांचाच असेल, आणि त्याच अनुषंगाने राज यांनी शाह यांना भेटावे असे स्पष्ट करत महासचिव विनोद तावडे हे राज यांना अमित शाह यांच्या भेटीस घेऊन गेले. या भेटीत दक्षिण मुंबईतील जागा मनसेने लढवावी, पण या जागेवरून थेट अमित ठाकरे यांनाच निवडणूक रिंगणात उतरवावे असा सल्ला राज यांना देण्यात आला अशी चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातील वरळी येथे उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे सौजन्य राज ठाकरे यांनी दाखवले होते. खरंतर वरळी मतदारसंघात मनसेची मोठी ताकद आहे.

पण आपल्या पुतण्याला प्रथमच निवडणूक लढवत असताना अपशकुन नको म्हणूनच राज यांनी इथून मनसेचा उमेदवार उभा केला नाही असे बोलले जाते. आता अमित ठाकरे स्वतः जर लोकसभा रिंगणात उतरले तर मात्र सगळीच गणितं बदलली जातील हे मात्र निश्चित. या जागेसाठी ज्या बाळा नांदगावकर यांचे नाव घेतले जात होते त्यांनी राज दिल्लीतून आल्यावर शिवतीर्थ येथे त्यांची भेट घेतली व नंतर माध्यमांशी बोलताना, राज यांनी सांगितले तर आपण गडचिरोलीमधून देखील निवडणूक लढवू असे सूचक उद्गार काढत, अमित ठाकरे यांचे नाव पक्षाने दक्षिण मुंबईत अंतिम केल्यास आपली संमती असल्याचेच सुचवले असेही बोलले जात आहे.

शिर्डी येथे सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. दक्षिण मुंबईसह जर शिर्डी येथे देखील मनसेच लढली तर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यात महायुतीला राज यांच्या मनसेचा फायदा होऊ शकतो असे राजकीय गणित भाजपने मांडले आहे. तर दक्षिण मुंबईतील जागेमुळे मुंबईतील उर्वरित पाच मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे व कोकण यासर्वच ठिकाणी मनसैनिक मैदानात उतरून महायुतीला भक्कम करू शकतो असे आराखडे बांधले गेले आहेत.

आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत असे सांगितले जात आहे , या दोन्ही भेटी जर आजच झाल्या तर मनसे आणि महायुतीची हातमिळवणी नक्की कधी होईल ते चित्र स्पष्टपणे समोर येईल.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात