मुंबई : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार एव्हेन्यू कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौकशीदरम्यान आतिशींसह सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचा दावा ईडीने (ED) न्यायालयात केला आहे . यावरून आता मंत्री आतिशी (Atishi) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे , आपच्या नेत्यांना राजकारणातून संपण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे .तसेच आता पक्षाच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार असल्याचा मोठा दावा करत भाजपकडून पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा चांगला चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)आणि खासदार संजय सिंह(Sanjay Singh )या प्रकरणात तुरुंगात आहेत. आता आणखीन चार नेत्यांना अटक होणार असल्याची माहिती समोर आली आहे . याबाबत मंत्री आतिशी म्हणाल्या, माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि खासदार राघव चड्ढा यांनाही अटक करतील. आम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत आमच्या घरी ईडीचे रेड पडेल. माझे कुटुंब, नातेवाईकांच्या घरावरही रेड पडेल. समन्स पाठवले जाई आणि अटक करतील असा गौप्यस्फोट त्यांनी नावासकट केला आहे . त्यामुळे आपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . .
दरम्यान ईडीने काल कोर्टात केजरीवाल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे . तसेच त्यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या सहभागाचा दावा केल्याबाबत आतिशी म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयकडे दीड वर्षांपासून असलेल्या जबाबाच्या आधारे आमचे नाव काल कोर्टात घेण्यात आले. हा जबाब सीबीआयच्या आरोपपत्रातही आहे. मग आत्ताच आमची नावे कोर्टात घेण्याचा उद्देश काय होता, असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला.आता लोकसभेच्या तोंडावर आपला अनेक संकटाचा सामना करावा लागणार असलयाचे दिसून येत आहे .