X : @vivekbhavsar
मुंबई: कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने त्यांचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार हे कोमटी या अल्पसंख्यांक समाजाचे आहेत तर धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. याच समाजाच्या बळावर 2019 मध्ये बाळू धानोरकर निवडून आले होते. त्याचमुळे कोमटी समाजाचा ओबीसी समाजात समावेश करण्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता. यातून नाराज झालेला ओबीसी समाज आणि कुणबी समाज सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात एकवटला असून सुधीर भाऊ यांच्यासाठी आणि भाजपसाठी दिल्ली बहुत दूर है अशीच प्रतिक्रिया चंद्रपूरमधून व्यक्त होत आहे.
मुळातच लोकसभेसाठी इच्छुक नसलेले सुधीर भाऊ यांनी या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात देखील अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या किंवा आमदाराच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. बल्लारपूर येथून निवडून येत असलेले सुधीरभाऊ यांनी या मतदारसंघाच्या पलीकडे कधी बघितले नाही किंवा मंत्री असून देखील कधी अन्य मतदारसंघात लक्ष घातले नाही. असे म्हटले जाते की अन्य मतदारसंघात लक्ष घातल्यास त्या मतदारसंघातील आमदार देखील आपल्या मतदारसंघात लुडबुड करतील, अशी भीती सुधीर भाऊ यांना नेहमी वाटत असे. मात्र याचा परिणाम असा झाला की राज्याचे मंत्री असून देखील सुधीर भाऊ यांचा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात लोकांशी कनेक्ट नाही. हीच बाब त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.
सुधीरभाऊ ज्या कोमटी समाजातून येतात, त्या समाजाचे एकूण मतदार 1100 पेक्षा जास्त नाहीत. तर कुणबी समाजाची मतदार संख्या जवळपास सहा लाख आहे. दीड लाख दलित मतदार तर जवळपास एक लाख मुस्लिम मतदार आहेत. ओबीसी समाजाची संख्या देखील प्रचंड मोठी आहे. दलित आणि मुस्लिम समाज भाजपला कधी मतदान करत नाही.
सुधीर भाऊ यांनी त्यांच्या कोमटी समाजाचा समावेश ओबीसी समाजात करावा यासाठी प्रयत्न केले, तसा प्रस्ताव त्यांनी सादर केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ओबीसी समाज सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नाराज आहे. ज्यावेळी मनोज जरांगे – पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते, त्याचवेळी चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज देखील आंदोलन करत होता. ओबीसी समाजाने आंदोलन मागे घ्यावे, उपोषण थांबवावे यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न करून बघितले, मात्र ते ओबीसी समाजाचे नेते नसल्यामुळे आंदोलकांनी त्यांची विनंती धुडकावून लावली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर ओबीसी समाजाने उपोषण सोडले होते.
दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात फारसे सख्य नाही. धानोरकर आपले ऐकत नाही, त्या आपल्याला नेते मानत नाही आणि सगळे निर्णय स्वतःच घेतात अशी वडेट्टीवार यांची तक्रार आहे. हेच वडेट्टीवार सुधीर मुनगंटीवार यांचे मात्र खूप खास मित्र आहेत. आपल्याला निवडणूक लढवायची नाही हे गुपित सुधीर भाऊ यांनी वडेट्टीवार यांच्याकडेच बोलून दाखवले होते. विजयभाऊ यांनी त्यांच्या मुलीसाठी – शिवानीसाठी काँग्रेसकडे लोकसभेचे तिकीट मागितले होते.
काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले आणि याची कुणकुण लागल्याने प्रतिभा धानोरकर दिल्लीत जाऊन ठान मांडून बसल्या. शिवानी वडेट्टीवार किंवा विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले असते तर सुधीर भाऊ सहज निवडून आले असते. ही बाब प्रतिभा धानोरकर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांचे निकटवर्तीय दावा करतात.
गेल्या वेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या रूपात महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता आणि पक्षाची नाचक्की वाचली होती. ही वस्तुस्थिती असूनही एकवेळ वामनराव चटप चालतील पण प्रतीभा धानोरकर नको, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. यातून संतप्त झालेल्या कुणबी समाजाकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक प्रचार करण्यात आला.
दिवंगत खासदाराच्या विधवा पत्नीचे तिकीट कापले जावे यासाठी तुम्ही प्रयत्न केले, हे कुणबी समजा विसरणार नाही आणि पुढे धडा शिकवू अशा आशयाचे संदेश समाज माध्यमात फिरवण्यात आले.
दुसरीकडे यावेळी भाजपच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात आला असला तरी २०१९ सारखे हा उमेदवार लाखाची मते घेणार नाही तर केवळ १५ ते २० हजार मतावर वंचितला समाधान मानावे लागेल असे समजले जात आहे. यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असून मतविभाजन होण्याची शक्यता नाही. कुणबी, ओबीसी तसेच भाजपावर नाराज असलेला दलित आणि मुस्लिम समाजाचे मतदान काँग्रेस उमेदवाराला होऊ शकेल आणि त्यातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दिल्लीचा मार्ग अवघड होईल, असे म्हटले जात आहे.
Also Read: धुळ्याची जागा शिंदे सेनेला तर नाशिकमधून भाजप लढणार?