मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . या लोकसभेसाठी इतर पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे महाजन म्हणाले आहेत . तसेच राज्यातील, देशातील नेतृत्वावर कोणाचा विश्वास राहिला नसल्याने अनेकजण मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत आमच्या आणि आमच्या मित्र पक्षात अनेकजण येणार असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे .
भाजपामध्ये अनेक नेते प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य करताना त्यांनी आमच्या मित्र पक्षात कोणतीही नाराजी नाही, लवकरच सगळ्या मित्र पक्षांना सोबतघेऊन आम्ही मेळावे घेणार आहोत. कुठेही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. कोणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे . दरम्यान याआधी भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे . या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या जागी पक्षाने दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे . मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यातील विदिशा मतदारसंघातून, तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आता इतर पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजपच्या ताकदीला आता आणखीन बळ मिळणार आहे
लोकसभेसाठी भाजपकडून रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघात दावा करण्यात आला आहे . या दोन्ही मतदारसंघात आम्ही राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा आमचा संकल्प आहे. महाविकास आघाडीसह (Maha Vikas Aghadi )विरोधकांचा पूर्ण बारा वाजले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहे, तेही फार काळ सोबत राहणार नाही. लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे त्यांनी कितीही आघाड्या केल्या तरी मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे .