मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. भाजपकडून कंगनाला तिकीट दिल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आणि खासदार अनुराग ठाकूर यांचे आभार मानले. यासोबतच अभिनेत्रीने पक्षाच्या जिल्हा युनिटसोबत होळी साजरी केली आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या.
मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने बॉलिवूड कलाकाराला तिकीट दिलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत मंडीतून फिल्मी कलाकाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून कंगनाच्या विरोधात कोण लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान कंगणाचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन वर्षांपूर्वी एका युजरने कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवेल असं लिहिलं होतं. यावर उत्तर देताना कंगना म्हणाली होती, 2019च्या निवडणुकीत मला ग्वाल्हेरचा पर्याय दिला होता. हिमाचल प्रदेशाची लोकसंख्या जेमतेम 60 ते 70 लाख आहे. तिथे कोणी गरीब नाही. तिथे गुन्हे घडत नाहीत. राजकारणात आले तर ज्या राज्यात समस्या आहेत. तिथूनच निवडणूक लढेल. मी त्या मतदारसंघात काम करू शकते आणि राणी बनू शकते. एक वर्षानंतर लगेच कंगनाने घुमजाव केलं होतं. भाजपने तिकीट दिलं तर मी मंडीमधून लढायला तयार आहे, असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर तिला मंडीतून तिकीट देण्यात आलं आहे.
काँग्रेसची आक्षेपार्ह पोस्ट…
काँग्रेस नेत्या सुप्रिया यांनी कंगनाच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर भाजप नेते काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. ही पोस्ट नंतर हटवण्यात आली असली तरी या प्रकरणाचा वाद थांबताना दिसत नाही. आता या पोस्टवर कंगना राणौतची प्रतिक्रियाही समोर आली आहे.