X: @ajaaysar
मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे.
भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि २६) रोजी काही उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. उबाठा गट देखील उद्याच काही उमेदवार त्यांचे मुखपत्र “सामना” मधून प्रसिद्ध करेल अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. शरद पवार गट देखील येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असून काँग्रेसने काही जागांवर आपले उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. वंचित आघाडीच्या बरोबर युतीची घोषणा उबाठा गटाने काही महिन्यांपूर्वी केली होती.
मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांना अक्षरशः झुलवत ठेवण्याचे राजकारण शिवसेना उबाठा गटाने मोठ्या खुबीने खेळले आहे. जेमतेम चार जागा वंचितला देऊ करत उबाठा गटाने प्रकाश आंबेडकरांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. आंबेडकरांनी देखील त्या चारही जागा तुम्हांलाच परत देतो, तुम्हीच त्या लढवा, असे रोखठोक उत्तर उबाठा गटाला दिले आहे.
दक्षिण मध्य मुंबई ही जागा उबाठा गटाने अनिल देसाई यांच्यासाठी तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्यासाठी मागितली आहे. उत्तर पूर्व ही जागा शरद पवार गटाने नगरसेविका राखी जाधव यांच्यासाठी मागितली आहे तर उबाठा गटाने या जागेवरील दावा कुठल्याही शिवसैनिकासाठी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या संजय दीना पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा केला आहे. सांगलीची जागा व उमेदवार उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व या जागेवर आपला उमेदवारच निवडणूक लढवेल, असे उबाठा गटाला सुनावले आहे.
उत्तर पश्चिम मुंबईत उबाठा गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसमध्ये असंतोष असून ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम बंडाच्या पवित्र्यात आहेत. भिवंडीची जागा शरद पवार गट आणि काँग्रेस या दोघांनी मागितली असून या जागेवरून प्रचंड वाद आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी भिवंडीला विशेष प्राधान्य दिल्याने ही जागा काँग्रेसने प्रतिष्ठेचा विषय केली आहे. यासर्व वादविवादांच्या धुळवडीत महाविकास आघाडीचे जागावाटप अडकलेले दिसत आहे.
मनसेच्या होऊ घातलेल्या महायुतीमधील एन्ट्रीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या जागावाटपाला जणू स्पीडब्रेकर लागला आहे. मनसेने दक्षिण मुंबई, शिर्डी व नाशिक या जागा मागितल्या आहेत असा धुरळा राज ठाकरे व अमित शाह यांच्या दिल्ली भेटीनंतर माध्यमांमध्ये उडाला आहे. या तीनही जागांवर मुळातच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीमध्ये चुरस सुरू असताना आता मनसे येण्याच्या शक्यतेने आणखी वादळ निर्माण झाले आहे. उदयनराजे भोसले यांनी सातारा मतदारसंघ घड्याळ चिन्ह घेऊन लढवावा असा जोरदार आग्रह अजित पवारांनी भाजपकडे धरला आहे तर उदयनराजेंनी ही ऑफर थेट धुडकावून लावली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील चार मतदारसंघ भाजपकडे आहेत, अशावेळी कुठल्याही परिस्थितीत भाजपच ही जागा लढवेल असा सूर भाजपने लावला आहे.
पालघर मध्ये २०१९ ला भाजपकडून आयात केलेले उमेदवार राजेंद्र गावित शिवसेनेने आपल्याकडे घेतले होते, ते आता विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ देखील परत भाजपला देण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे. रत्नागिरी मतदरसंघात सुरू असलेला जागावाटपाचा घोळ अजून मिटलेला नाहीच. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्यापैकी एक उमेदवार देऊन ही जागा भाजपने लढवायची तयारी केली आहे तर जागा फक्त आमचीच असा सूर लावत शिवसेनेचे किरण सामंत देखील या मतदारसंघात मोठे दावेदार आहेत. नाशिकची जागा ही भाजपची आहे, हेमंत गोडसेंना भाजप मदत करणार नाही असा आक्रमक पवित्रा नाशिकच्या दिनकर अण्णा पाटील यांनी जाहीर केला आहे, तर ही जागा राष्ट्रवादीला द्यावी असा आग्रह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धरला आहे.
हातघाईवर आलेल्या या उमेदवारीच्या लढाईत ही जागा परत मिळवण्यासाठी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काल जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्याने एक वेगळाच मेसेज काल राज्यभर गेला आहे. शिस्तबद्ध शिवसेनाप्रमुखांचा आणि शिवसेनेचा विचार व वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशी दबावाची खेळी कितपत रुचली असेल ही शंकाच आहे.
आज एकजण शक्ती प्रदर्शन करायला ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आला, उद्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करून दबाव टाकायचा आणि तिकीट मिळवायचा पायंडा पडू शकतो, त्यामुळे या प्रवृत्तीना वेळीच आळा घालणे आवश्यकच आहे. गोडसे हे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी तिकीट मागण्यात काही गैर नाहीच, पण ही संघटना आणि पक्ष शिवसेना आहे तिथे शिस्त जास्त महत्त्वाची आहे, असा संदेश वेळीच पक्षात जाणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचा शिमगा काल थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरासमोरच बघायला मिळाला असे चित्र संपूर्ण राज्यात निर्माण झाले आहे.
दोन दिवसात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे व काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित महाविकास आघाडीचे बहुतांश जागावाटप झाले असेल असे एकंदरीत चित्र आहे.