मुंबई- नगरसाठी बुधवार महत्त्वाचा ठरला. दोन महत्त्वाचे निर्णय एकाच दिवशी झाले. अहमदनगर हे शहराचं नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर यानंतर थोड्याच वेळात अहिल्यानगर खासदारकीच्या भाजपाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या उमेदवारीसाठी राम शिंदे, राम सातपुते अशी भाजपातील इतरही काही नेत्यांची नावं चर्चेत होती. मात्र अखेरीस उमेदवारी सुजय विखे पाटील यांना मिळालेली आहे.
विखे पाटील यांच्यासमोर कुणाचं आव्हान?
नेहमीप्रमाणे यावेळीही होणारी ही खासदारकीची निवडणूक विखे विरुद्ध सर्वपक्षीय अशी होण्याची शक्यता आहे. यात भाजपातील काही नेत्यांचाही विखेंना विरोध असल्यामुळं ते काय करणार, हाही प्रश्न आहेच. अशा स्थितीत विखे पाटील यांच्यासमोर पारनेरचे आमदार निलेश लंके हे मविआचे उमेदवार असण्याची चर्चा रंगलीय.
लंके आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
आमदार निलेश लंके यांच्या घराच्या बाहेर आज तुतारी वाजलीय. विखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, अनेक कार्यकर्ते आमदार निलेश लंके यांच्या घरा बाहेर गोळा झालेत. लंके यांच्या ‘मी अनुभवलेलं कोविड’ या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात होणार आहे. याच वेळीस निलेश लंकेचा पक्षप्रवेश होणार असल्याचं मानण्यात येतंय. घरातून निघताना निलेश लंकेचं औक्षण करण्यात आलं, त्यानंतर लंके आईच्या चरणी झाले आणि त्यानंतर लंके पुण्याच्या दिशेनं निघालेले आहेत. निघण्यापूर्वी वेळ आणि काळच उमेदवार ठरवेल, असं सूचक विधान त्यांनी केलंय.
दोन दिवसांपूर्वीही पक्षप्रवेशाची चर्चा
पुण्यात दोन दिवसांपूर्वीही निलेश लंके यांनी मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत होतं. त्याच दिवशी त्यांचा शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत प्रवेश होणार हेही सांगण्यात येत होतं. प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही. याचवेळी शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची आणि लंके यांची भेटही झाली होती. या भेटीनंतर लंके अस्वस्थ असल्याचं अमोल कोल्हे यांनीही सांगितलं होतं. निलेश लंके यांनी मात्र अजित पवारांसोबतच असल्याचं सांगत, पक्षप्रवेशाबाबत केवळ अफवा असल्याचा पवित्रा घेतला होता. आता आज ते पुन्हा पुण्यात शरद पवारांची भेट घेतायेत. या भेटीत, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःपंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचं काय?