मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये शरद पवार गटांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar )यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नणंद-भावजय लढाईत कुणाला कौल मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले असतात्ना आता या मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे . कारण या मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध आता अजित पवारांचाही (ajit Pawar )उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या ठिकाणची लढाई भाऊ विरुद्ध बहिणीत होणार की काय अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अजित पवार आणि शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांच्या नावे अर्ज घेण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज घेण्यात आला आहे.काही कारणास्तव सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद ठरल्यास त्यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार म्हणून खुद्द अजित पवार यांचा अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या नवीन खेळीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
दरम्यान या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. त्यामुळे १८ एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. सुनेत्रा पवार, पुणे मतदार संघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)आणि शिरुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil )हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी पुण्यात सभा घेतली जाणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही निमंत्रित करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले आहे .