मुंबई: भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला.त्यातून नवा वाद उभा करून त्यांनी अदानीला वाचवले आणि लोकसभेत त्याच्यावरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली, असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला.
गुरुवारी मुंबईतील धारावी येथील डॉ. मनोहर जोशी कॉलेजमध्ये झालेल्या बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
हा मेळावा राष्ट्रीय चर्मकार संघ, प्रजासत्ताक जनता परिषद आणि आंबेडकरवादी भारत मिशन यांनी आयोजित केला होता. त्याच्या अध्यक्षस्थानी चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने होते. डॉ. सुरेश माने यांच्यासह दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या मेळाव्यात मार्गदर्शक होते.
इतरांचे अजेंडे झुगारून द्या
सारी दलित चळवळ आजघडीला क्रियावादी होण्याऐवजी निव्वळ प्रतिक्रिया वादी बनली आहे. भाजप त्याचाच फायदा उठवत आहे, असे सांगून डॉ. सुरेश माने म्हणाले की, आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून तो पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे. इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही?
उत्तर भारतात चर्मकार समाज नायक
महाराष्ट्रात दलित चळवळीचा कणा हा आंबेडकरी बौद्ध समाज जसा आहे, तसाच उत्तर भारतात चर्मकार समाज हाच दलित चळवळीचा नायक आहे. त्याचा आदर्श येथील चर्मकार, मातंग समाजाने घेवून दलित चळवळीत नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन दलित पँथरचे नेते सुरेश केदारे यांनी या मेळाव्यात केले.
पुणे करार मोडीत काढण्यावर
भाजप – काँग्रेस यांच्यात एकमत
शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे करार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू महासभेचे नेते पंडित मदन मोहन मालवीय यांच्या स्वाक्षरीने हिंदू आणि अस्पृश्य या दोन समाजांमध्ये झालेला होता. आरक्षण नष्ट करून तो मोडीत काढण्यावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमत दिसून आले आहे.
जातीय ओळख नष्ट करा
आपली जात आणि जातीय ओळख या गोष्टींना बिलगून बसू नका, असे आवाहन करतानाच मातंग समाजाचे नेते प्रबुद्ध साठे यांनी केले. सर्व दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अनुसूचित जाती ‘ ही वर्गीय ओळख दिली. पण एक वर्ग म्हणूनही आपण एकवटून आजवर उभे राहिलो नाही, अशी खंत व्यक्त केली.
चर्मकार समाज अत्याचारांचे टार्गेट
बौद्ध समाजात राजकीय बेकी असली तरी अत्याचाराविरोधात तो एकजुटीने उभा ठाकतो. पण त्या संघटितपणाचा अभाव असल्यामुळे चर्मकार समाज हल्ली अत्याचारांच्या निशाण्यावर आला आहे, असे या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक , आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.