बारामती : आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद-भावजयीमधील संघर्षाला शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर वेगळंच वळण लागलं आहे. आता हा वाद सून विरूद्ध लेक असं झाल्याचं दिसत आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. पुरोगामी विचारांचे आणि कधीच मुलगा-मुलगीमध्ये भेद न करणाऱ्या शरद पवारांना ४० वर्षे त्यांच्या घरात नांदणारी मुलगी घरातली वाटत नाही तर परकी वाटते. 40 वर्षे पवारांच्या घरात नांदणारी मराठवाड्यातील पाटलांची लेक ही पवार साहेबांना आपली वाटत नाही, परकी वाटते याच्यापेक्षा दुर्दैव ते काय? पण काहीही होवो, बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच बाजूने लागणार., असा विश्वास चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.
याबरोबरच अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर निराशा व्यक्त केली. शरद पवारांनी महिलांना सन्मान आणि चांगली संधी दिली. मात्र शरद पवारांनी काल केलेलं वक्तव्य क्लेषदायक आहे. ३०-३५ वर्षांपासून महिला धोरण राबवणारे साहेब हेच आहेत का असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, माहेरी वाढलेली लेक सासरच्या लोकात एकरूप होत असते. मालोजीराजेंची सून जिजाबाई, मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई होळकर, शिवाजी महाराजांची सून येसूबाई ही उदाहरणं पाहिली तर या सासऱ्यांनी आपल्या सुनांना बाहेरचं म्हणून वागवलं नाही. मात्र शरद पवारांचा वक्तव्य वेदना देणारं आहे, असं चाकणकर यावेळी म्हणाल्या.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं. यावेळीही हेच करायचं आहे. आतापर्यंत बारामतीकरांनी पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेला आणि आता सुनेला मतदान करायचं आहे. यावर शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे. पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे असा टोला शरद पवारांनी लगावला होता.