बारवी प्रकल्पग्रस्तांची ५५ वर्षांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही
गोपाळ पवार | मुरबाड
मुरबाड : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या कुशीतील बारा गावपाड्यांची अवस्था आजही तहानलेलीच आहे. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या या धरणामुळे कायमची मिटली असताना, धरणबाधित गावांमध्ये मात्र “दिव्याखाली अंधार” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याने भरलेले धरण शेजारी असूनही पाण्यासाठी विहिरीत उतरून चिखलातून पाणी काढण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
काचकोली, कान्होळ, कोले, वरखड, मोहघर ही गावे आणि जांभूळवाडी, मारधवाडी, बुरुडवाडी, देवपाडा, देवराळवाडी, सुकाळवाडी, तळेवाडी या पाड्यांमध्ये फेब्रुवारीपासून पुढील चार ते सहा महिने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. १९७९ पासून आजतागायत या एकाही गावात नळयोजना राबवण्यात आलेली नाही, ही बाब प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरते.
पाण्यासाठी महिलांची दररोजची लढाई
उन्हाळा सुरू झाला की महिलांचा दिवस पाण्यासाठीच जातो. तळपत्या उन्हात रानोमाळ भटकून विहिरी, बोअरवेल किंवा डबक्यातून पाणी आणावे लागते. डोक्यावर हंडे ठेवून मैलोनमैल चालणे हीच येथील महिलांची दैनंदिन दिनचर्या झाली आहे. पाण्यासाठीचा हा संघर्ष इतका तीव्र आहे की, अनेक कुटुंबांमध्ये महिलांचा अर्धा दिवस फक्त पाणी आणण्यातच खर्ची पडतो.

टँकरवर गावांची मदार, तेही दूषित पाणी
डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत गावांना टँकरवरच अवलंबून राहावे लागते. मात्र हा टँकर पुरवठाही नियमित नसतो. अनेक वेळा हे पाणी चिखलयुक्त आणि दुर्गंधीयुक्त असल्याने वापरण्यास अयोग्य ठरते. गेल्या वर्षी या दूषित पाण्याविरोधात महिलांनी आंदोलनही केले होते. तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
पुनर्वसनाचा खेळ… आणि अपूर्ण आश्वासने
“धरण उशाला आणि कोरड घाला” अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. १९७२ मध्ये धरण उभारण्यासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या शेतकऱ्यांची आज ५५ वर्षांनंतरही परवड सुरू आहे. अनेक गावांचे पुनर्वसन आजही अपूर्ण आहे.
मोहघर-२ गावाचे दोनदा पुनर्वसन झाले, मात्र ११५ घरांची आणि सुमारे ११०० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या गावात आजही पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. दोनदा पुनर्वसन होऊनही मूलभूत सुविधा न मिळणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे स्पष्ट उदाहरण आहे.
शेती आणि पशुधनावर पाण्याचा घाला
पाणीटंचाईमुळे शेती आणि दुग्धव्यवसाय दोन्ही कोलमडले आहेत. एकेकाळी हजारो पशुधन असलेल्या या भागात आज शंभर गाई-म्हशीही शिल्लक नसल्याचे शेतकरी सांगतात. पाणी नसल्याने चारा नाही, आणि चारा नसल्याने पशुधन नाही — अशी साखळी तयार झाली आहे.

आंदोलने झाली… पण तोडगा नाही
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी बारवी प्रकल्पपीडित सेवा संघाने वारंवार आंदोलन केले. मात्र सरकारकडून ठोस निर्णय झालेला नाही. एमआयडीसीकडून टँकर पुरवठ्यासाठीही चालढकल होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ड्रोन सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. जमिनीच्या मोबदल्याबाबतही निर्णय झाले, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्यापही प्रलंबित आहे.
शहरांना पाणी… गावांना उपेक्षा
१९७२ मध्ये पिंपळोली येथे बांधण्यात आलेल्या बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो. उद्योग आणि शहरांचा विकास या धरणामुळे झाला, मात्र ज्या मुरबाड तालुक्यातील गावांनी या विकासासाठी आपली जमीन दिली, त्या गावांना आजही मूलभूत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
“ना घर का, ना घाट का” — प्रकल्पग्रस्तांचा संताप
स्थानिकांच्या मते, जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला, पुनर्वसन आणि मूलभूत सुविधा या तिन्ही बाबतीत प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी बारवी धरणग्रस्तांची अवस्था आजही “ना घर का, ना घाट का” अशीच आहे.
(EDITOR’S NOTE)
हे छायाचित्र आणि व्हिडिओ “राजकारण” च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन टिपले आहेत.

