मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडलेले एक लग्न प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. एका १९ वर्षीय तरुणीने वेगवेगळ्या नावांनी आणि मध्यस्थांच्या मदतीने तब्बल नऊ विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक वेळी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वरपक्षाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मराठवाड्यात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत ग्रामीण भागातील अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. विवाह जुळत नसल्याने अनेक कुटुंबे चिंतेत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर समोर आलेले हे प्रकरण सामाजिक वास्तव अधोरेखित करणारे मानले जात आहे.
तीन लाखांत लग्न; महिनाभरात संशय
बीड जिल्ह्यातील उमापूर येथील योगेश शिंदे या तरुणासाठी एका मध्यस्थामार्फत स्थळ सुचविण्यात आले. संबंधित तरुणी सुशिक्षित आणि योग्य असल्याचे सांगत मध्यस्थाने विवाह जुळवून देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. अखेरीस तीन लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला.
यानंतर उमापूर येथील एका मंदिरात योगेश शिंदे आणि भारती जितेंद्र गुमस्ते या नावाने ओळख करून देण्यात आलेल्या तरुणीचा विवाह झाला. मात्र विवाहानंतर काही दिवसांतच तिच्या वर्तनाबाबत संशय निर्माण झाला. सतत माहेरी जाण्याचा आग्रह आणि टाळाटाळ यामुळे चौकशी करण्यात आली असता, त्या तरुणीने यापूर्वी अनेक विवाह केल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
योगेश शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणी घरातील काही रोख रक्कम आणि दागिने घेऊन निघून गेली. त्यानंतर चकलंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
‘मध्यस्थ’ की फसवणूक रॅकेट?
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रत्येक विवाहात वेगवेगळे ‘आई-वडील’ आणि मध्यस्थ उभे केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा प्रकार एखाद्या संघटित टोळीमार्फत राबवला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात विवाहासाठी मुली मिळत नसल्याने अनेक कुटुंबे मध्यस्थांवर अवलंबून असतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही जण लाखो रुपयांची फसवणूक करीत असल्याची चर्चा आहे.
ग्रामीण भागातील बदलते वास्तव
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विवाह जुळण्यात अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण वयाची तिशी-पस्तिशी ओलांडल्यानंतरही अविवाहित असल्याचे दिसते. बदलती सामाजिक परिस्थिती, अपेक्षा, आर्थिक स्थिती आणि स्थलांतर यांसारख्या कारणांमुळे ही समस्या गंभीर होत चालल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.
प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी
या प्रकरणानंतर विवाह जुळवून देणाऱ्या बोगस संस्था आणि एजंटांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही जण वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातूनही फसवणूक करीत असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणीही पुढे येत आहे.
विवाह संस्थेभोवती निर्माण झालेली सामाजिक अस्थिरता आणि त्यातून वाढणारे फसवणुकीचे प्रकार ही गंभीर बाब बनत चालली आहे. बीडमधील ही घटना केवळ एका कुटुंबाची फसवणूक नसून ग्रामीण समाजातील बदलत्या वास्तवाचे संकेत देणारी मानली जात आहे.

