भिवंडी : सांगली, नगरनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून दावा केला जात होता. मात्र शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेत सुरेफ उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे, आणि ते मविआच्या उमेदवाराला प्रचारात साथ देत नसल्याचं सांगितलं जात आहे.
बाळ्या मामा म्हात्रे यांनी मंगळवारी प्रचाराची रणतीनी ठरवण्यासाठी भिवंडी शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत एका बैठकीच आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याला उपस्थित राहण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. कार्यालयातील दुरुस्तीचं काम पूर्ण न झाल्यानं ही बैठक रद्द करण्यात आल्याचं कारण देण्यात आलं असून येत्या काही दिवसात ही बैठक घेण्यात येईल असं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी भिवंडी शहर काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यत आलं होतं. मात्र त्यांनी बैठकीत येण्यास नकार दिल्याने ही बैठक रद्द करावी लागली. परिणामी भिवंडी मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये आलबेलं नसल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा- कोणतीही निवडणूक बिनविरोध होण्यास विरोध, सत्यजीत तांबे यांचं भाजपावर टीकास्त्र
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे कपिल पाटील तिसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे शरद पवार गटातील बाळ्यामामा म्हात्रे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. याशिवाय जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. वंचितकडून त्यांना पाठिंबा देण्यात आल्यानं भिवंडीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र काँग्रेसच्या नाराजीमुळे बाळ्या मामांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.