अमरावती- नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आधीच वादात सापडली आहे. ही सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या सायन्स कोअर मैदानावर त्याच दिवशी सभेची परवानगी बच्चू कडू यांनी मिळवली होती. मात्र अमित शाहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. यानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्यासोबत या मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावरुन मंगळवारी रात्री १० पर्यंत पोलिसांशी त्यांचा संघर्ष सुरु होता. अखेरीस अमरावतीत दंगलीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून माघार घेत असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. मात्र आज दुपारी बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते प्रहार जनशक्तीचे उमेदवार दिनेश बूब यांच्यासाठी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तर आजच संधअयाकाळच्या सुमारास राहुल गांधी यांचीही सभा अमरावतीत होते आहे.
का केली सभेची परवानगी रद्द
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं सायन्स कोअर मैदानावर आजच्या सभेची परवानगी सहा दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र मंगळवारी ही परवानगी रद्द करुन हे मैदान अमित शाहा यांच्या सभेसाठी देण्यात आल्याचं कडूंना कळवण्यात आलं. यानंतत संतापलेले कडू आणि त्यांचे ५०० ते ६०० कार्यकर्ते मैदानाचा ताबा घेण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास सायन्स कोअर मैदानात पोहचले होते. अमित शाहा यांच्या सुरक्षेसाठी या मैदानाची तयारी पूर्ण झाली असल्यानं आता दुसरं मैदान शक्य नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यानं कडूंना परवानगी नाकारल्याचं सांगण्यात येतंय.
दंगल घडवण्याचा कट- बच्चू कडू
रात्री उशिरापर्यंत आंदोलन करुनही प्रशासन झुकत नसल्यानं बच्चू कडू यांनी माघार घेण्याची भूमिका घेतली आहे. नवनीत राणा यांच्याकडून प्रचंड पैशांची उधळण या मतदारसंघात होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हनुमान जयंतीच्या निमित्तानं शहरात दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. रात्रीतून २०,२५ हजार कार्यकर्ते जमा होणार होते. मात्र डाग लागू नये, यासाठी माघार घेत असल्याची भूमिका त्यांनी घेतलीय. मात्र बूब यांच्या समर्थनासाठी शहरात ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
कडू यांची नौटंकी-भाजपा
तर अमित शाहा यांच्या बैठकीच्या निमित्तानं बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे नौटंकी करत आहेत. अशी टीका भाजपा आणि राणा यांच्याकडून करण्यात येतोय. शाहा येत असल्यानं माध्यमांचं लक्ष स्वत:कडे वेधण्याचा हा कडूंचा प्रयत्न असल्याची टीका रवी राणा यांनी केलीय.
राहुल गांधी यांचीही सभा
काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आज महाराष्ट्रात आहेत. सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अमरावतीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्यासाठीही राहुल गांधी यांची प्रचारसभा होणार आहे. या तिन्ही राजकीय घडामोडीत अमरावतीत नेमकं काय होणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचाःशिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच ; मिंध्याना मी मानतच नाही ; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल