मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा ओलांडली जाऊ नये, महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतेही स्थान नाही, असा ठाम संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण पाळेमुळे खणून काढून कठोर कारवाई करण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्रद्धा म्हणजे सकारात्मकता, प्रामाणिकता आणि इतरांचे अहित नको अशी भावना. आपण सश्रद्ध आहोत; मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील छोटी रेषा ओलांडली जाऊ नये.”
या प्रकरणावर अनेक सदस्यांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मंगळवारी सविस्तर निवेदन दिल्यानंतरही नवीन माहिती समोर येत आहे. “ज्या सदस्यांकडे माहिती असेल त्यांनी ती शासनाकडे द्यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र संतपरंपरेची भूमी असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, “दुरितांचे तिमिर जावो हीच आपली भूमिका आहे. अंधश्रद्धेविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल.” राज्यातील जादूटोणा विरोधी कायद्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विधी व न्याय विभागाची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याच्या कलम ३ अंतर्गत कारवाई शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कायद्याची अंमलबजावणी संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, न्यायसंहिता अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इ-साक्ष प्रणालीचा वापर ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे.
हरवलेल्या महिला व मुलींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, फक्त १.८६ टक्के प्रकरणे अपहरणाची असतात, तर विविध कारणांनी बाहेर गेलेल्या १ लाख ३१ हजार महिला व मुली घरी परतल्या आहेत.

