डॉ. अभयकुमार दांडगे
नांदेड
मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या एक वर्षांपासून राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यांचा आजचा राजीनामा हा भाजपची वाट धरण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचे आजी व माजी असे नऊ आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड- देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर तसेच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह माजी आमदार अमर राजूरकर व माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे त्यांच्या समवेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यामुळे नांदेडमध्येच आहेत. परंतु त्यांची भूमिका देखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहील, असे राजकीय गोटातून सांगितले जात आहे. जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय संकेत आहेत.
अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी दीडशे कोटी रुपयांची मदत केली. त्यावेळी मात्र पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काहीही मदत केली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी तसेच अशोक चव्हाण यांना झालेली भाजपची मदत ही मराठवाड्यातील राजकारणासाठी एक वेगळे व स्पष्ट संकेत देणारी घटना मानली गेली.

पक्ष सदस्यत्व सोडले
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.