नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 10 ते 15 दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच उमेदवार यादी जाहीर करत भाजपानं कुरघोडी केल्याचं मानण्यात येतंय. देशातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. मात्र महाराष्ट्राचा समावेश या यादीत नाही. मात्र महाराष्ट्रातील एकमेव नेते कृपाशंकर सिंह यांना उत्त्र प्रदेशातून उमेदवारी जाहीर करुन भाजपा श्रेष्ठींनी धक्का दिलेला आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 34 मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा समावेश आहे. दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी यांच्यासह 28 महिला उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळालेलं आहे. यादीत महिलांची टक्केवारी 14 टक्के आहे.
चार माजी मुख्यमंत्र्यांना भाजपानं लोकोसभेत उतरवलेलं आहे. यात शिवराजसिंह चौहान, अर्जुन मुंडा, सर्वानंद आणि विप्लव यांचा समावेश आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत एससी प्रवर्गातील 17, एसटी प्रवर्गातील 18 आणि 57 ओबीसी उमेदवारांना संधी देण्यात आलीय.
महाराष्ट्राला स्थान का नाही?
ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांसोबत सत्तेत आहे. त्या राज्यांतील उमेदवारांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेली नाही. बिहार आणि महाराष्ट्र ही भाजपासाठी महत्त्वाची राज्यं आहेत. या राज्यांत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपा श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. भाजपानं ठरवलेल्या 370 प्लस टार्गेटमध्ये या दोन्ही राज्यांतून जास्तीत जास्त उमेदवार हे भाजपाच्या चिन्हावर निवडून यावेत, यासाठी प्रयत्न आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी चर्चा विनिमय सुरु असल्यानं यादीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येतंय.
कृपाशंकर सिंह यांना संधी
मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकमेव नेत्याच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री, नेते कृपाशंकप सिंह यांना उ. प्रदेशात जौनपूरमधून भाजपानं निवडणूबक रिंगणात उभं केलंय. 2021 साली कृपाशंकर सिंह यांनी भआजपात प्रवेश केल्यापासून, त्यांनी उ. प्रदेशातील जौनपूर मतदारसंघात राजकारणाला सुरुवात केल्याचं सांगण्यात येतंय.
कृपाशंकर सिंह हे मुंबईतील उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा चेहरा आहेत. विलासराव देशमुखांच्या काळात त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. उत्पन्नाहून अधिक संपत्तीच्या प्रकरणात ते अडचणीतही आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. ज्या भआजपा नेत्यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात रण माजवलं होतं. त्याच भाजपाकडून आता कृपाशंकर सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे.
कृपाशंकर सिंह यांची राजकीय कारकिर्द
- 1977 साली महाराष्ट्र युवक काँग्रेस आणि सेवादलातून राजकारणात
- 1994 साली विधानपरिषदेचे आमदार
- 1999 साली विलासरावांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री
- 2019 साली काश्मिरातील 370 कलम हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचा राजीनामा
- 2021 साली भाजपात प्रवेश, प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी