मुंबई
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षणाची दार उघडून दिली. या अधिसूचनेवर ओबीसी समाजातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे.
आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी मराठा आरक्षण कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण? सगेसोयरे कुणबी समाजात शोधा पण नाव मराठा आरक्षण? काही मराठा समाजाच्या माणसांची नोंद कुणबी समाजात सापडल्या पण नाव मराठा आरक्षण? जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का? कुणबी समाजावर आमचं प्रेम पण या लढ्या मधे मराठा आरक्षण कुठे आहे? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला, याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पाठिंबा दिला. मात्र राणे कुटुंबानी या निर्णयाचा विरोध केला असून मराठा आरक्षण कुठे आहे, असा सवाल उपस्थित करीत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1752164848287527290/history
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, अशा शब्दात नारायण राणे यांनी ट्विट करीत २९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेची घोषणा केली होती.
मात्र काही कारणास्तव ती पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. ‘स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे् या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32 टक्के म्हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते’, अशा शब्दात राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.