मुंबई
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज पुन्हा मविआमध्ये जागावाटपासाठी
बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज तरी जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि भगवंत मान यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीला तर सुरुंग लागला आहे. अशा परिस्थितीत मविआसाठी एकत्र राहणं आवश्यक आहे. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सोशल मीडियावर ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे.
लोकसभा जागावाटपासाठी आज पुन्हा मविआ नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. मुंबईतच प्राथमिक चर्चा होणार होती. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलं त्यातून आपण नक्कीच शिकायला हवं. एकमेकांचा आदर राखूनच जागांबाबत निर्णय घ्यावा, जो निर्णय सर्वांना मान्य असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त जागा ठरवा, इतर पक्षांचे उमेदवार नाही. अन्यथा आघाडीला तडा जाऊ शकतो. भारताला वाचवण्याची जबाबदारी फक्त काँग्रेसची नाही तर सर्वांची आहे, अशा शब्दात संजय निरूपमांनी संकेत दिले आहेत.
वंचितबाबत अद्याप निर्णय नाही
महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश असेल की नाही, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना त्यात वंचितच्या एन्ट्रीने प्रश्न अधिक अवघड होऊ शकतात. संजय राऊत आणि शरद पवार हे वंचित मविआसोबत असल्याचं म्हणत असले तरी प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर कोणत्याही बैठकीत प्रत्यक्षात हजर राहिलेले नाही.