मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मतचोरी करून सत्ता मिळवली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मतचोरीसारख्या गंभीर मुद्द्यातही भाजपाला हिंदू-मुस्लीमच दिसते; त्यांची ही मानसिकता पाहून दया वाटते,” अशी टीका त्यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “मतचोरीचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस व राहुल गांधींनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे आहे.”
सपकाळ यांनी सांगितले की नागपूर जिल्ह्यातील कामठीत काँग्रेसने मोठे आंदोलन केले असून दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मोर्चातही पक्षाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
“मोर्चात मी होतो की नाही हा गौण मुद्दा आहे; मतचोरीचा प्रश्न सर्वात गंभीर आहे. भाजपाने यावर राजकारण करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न भाजप-महायुती सरकार करत आहे. तपास निष्पक्ष व्हावा यासाठी हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेली एसआयटी तात्काळ स्थापन करावी.”
चिब यांनी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
“चौकशीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीनचिट दिली आहे. मग सरकारी अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी कशी अपेक्षित?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चिब यांनी सांगितले की, “रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलिसांच्या छळाला कंटाळून डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. काँग्रेस हे प्रकरण गंभीरतेने घेत आहे.”
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “१० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन एसआयटी स्थापन न झाल्यास आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.”
राज्यभरातील युवक काँग्रेस कार्यकर्ते व तरुण या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
								
                                
                        
                            
