मुंबई : कथित दारू घोटाळाप्रकरणात ईडीने (ED)अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आता तुरूंगातून सरकार चालवणार अशी घोषणा झाल्यानंतर जोरदार टिकेची झोड उठलीय. आता यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर(BJP) हल्लाबोल चढवला आहे. भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का ? अजित पवारांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार होतात, ते गँगस्टर आहेत का ? बेलवर सुटलेले हसन मुश्रीफ गँगस्टर आहेत ? असा सवाल राऊत यांनी भाजपवाल्यांना विचारला. तसेच जेलमध्ये गेलेले केजरीवाल आता आणखी मजबूत झाले आहेत, लोकं त्यांच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, ते भांग पिऊन बोलत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
भारतीय जनता पक्ष (BJP)हा मोठा पक्ष नाही. तो कधीच मोठा पक्ष नव्हता. एखादा दरोडेखोर चोऱ्या-माऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे, तसं भाजपचं आहे. दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवायची, याला धनिक म्हणत नाही. सगळ्या पक्षातून माणसं चोरायची, तोडायची, फोडायची , लहान-लहान पक्ष विकत घ्यायचे ,याच्यात काय कर्तृत्व ? आत्ता तुमच्याकडे सरकार आहे, सत्ता आहे.. उद्या आमच्याकडे सत्ता येईल , तेव्हा तुमचा पक्षही शिल्लक राहणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान येत्या निवडणुकीत वंचीतचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar)सोबत नसले तरीही आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या पाठिशी जनमत आणि लोकमत आहे. तसेच बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत तर हा विजय अधिक दैदीप्यमान झाला असता. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत. महाराष्ट्रातल्या सोशित, पीडित, वंचित जनतेला आमच्यासोबत घ्यावं. प्रकाश आंबेडकर सन्माननीय नेते आहे. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आहे. ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. ते सदैव आमच्यासोबत असावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे सदैव प्रयत्न आहेत. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी खरंतर हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही, असेही राऊत म्हणाले.