मुंबई
भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण आणि अजित पवार गटाने घड्याळ चिन्हं चोरलं असलं तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. याच कारणास्तव जे पी नड्डा यांनी दोघांना आगामी निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काल जे. पी नड्डा मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे. कमळाबाईंच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढवा असा हा प्रस्ताव असून हे खोटे असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे. चिन्ह चोरले मात्र त्यावरच निवडणुका लढण्याची दोन्ही गटांमध्ये हिंमत नाही. तर भाजपकडे त्यांना या चिन्हावर लढू देण्याचे धाडस नाही असा हल्लाबोल देखील संजय राऊतांनी केला आहे.
या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्ह घेऊन लढेल आणि शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.