मुंबई
राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा – ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.
विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर, भाई जगताप, राजेश राठोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा, विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
सरकारला आशा सेविकांची कदर नाही – विजय वडेट्टीवार
मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमिका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडल्यानंतर आशा सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे सरकारकडून स्षष्ट करण्यात आले.
हे ही वाचा- आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत