महाराष्ट्र ताज्या बातम्या

Buldhana Lok Sabha : बुलढण्यात आमदार गायकवाड यांचा अर्ज दाखल, शिवसेनेत खळबळ, खासदार जाधवांना आव्हान

X: @ajaaysaroj

मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष धनंजय बोराटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे उपस्थित होते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावरच खासदार प्रतापराव जाधवांना डावलून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतूनच गायकवाड यांना जाधव यांच्या विरोधात बळ दिले जात आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha), चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, बुलढाणा, खामगाव, जळगाव-जामोद असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. २०१९ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी ५,२१,९७७ एवढी ४७ टक्के मते मिळवली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांना ३,८८,६९० एवढी ३५ टक्के मते मिळाली होती. प्रतापराव जाधव (MP Prataparao Jadhav) येथे विद्यमान खासदार असून पक्षाने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बुलढण्याचे अतिशय वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या लाठीने एका तरुणाला आमदार गायकवाड यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आपल्या गळ्यात जो हार आहे त्यामध्ये वाघाचा दात आहे, असा वादग्रस्त दावा त्यांनी केल्याने आमदार गायकवाड यांच्यावर वन विभागाने गुन्हा देखील नोंदवला आहे. तर रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय यांची मोताळा येथील जमीन बाबत देखील न्यायालयाने गायकवाड यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिलेले आहेत. अशा अनेक बाबतीत वाद ओढवून घेतलेले आमदार गायकवाड यांनीच थेट लोकसभेसाठी आज अर्ज दाखल केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. विदर्भ, मराठवाडामधील जुना जाणता चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द थेट खासदारकीपर्यंत बहरत गेली. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी क्रीडा मंत्रीपददेखील भूषवले आहे. १९९५ साली ते प्रथम मेहकर या मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल तीनवेळा ते आमदार झाले. २००९ मध्ये ते प्रथम दिल्लीत लोकसभेवर निवडून गेले. २०१४ आणि २०१९ मध्ये देखील त्यांनी लोकसभेची जागा जिंकून विधानसभेप्रमाणेच लोकसभेची देखील हॅटट्रिक साजरी केली. अत्यंत चोख आणि अचूक राजकीय व्यवस्थापन करणे ही त्यांची खासियत आहे असे म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वीच खासदार जाधव यांनी शरद पवार व रोहित पवार यांना पवार हे ओबीसी आहेत की मराठा आहेत ते जाहीर करावे असे आव्हान  दिले होते. त्यामुळे थेट पवार कुटुंबियांना अंगावर घेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जायला लागले. ज्यांनी आज अर्ज दाखल केला त्याच आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेत टीका केली होती. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तोंडात कोंबले असते, अशी भाषा आमदार गायकवाड यांनी वापरली होती. तेव्हा खासदार जाधव यांनी याच आमदार गायकवाड यांचे कान उपटले होते. भावनेच्या आहारी न जाता सर्वांनी तोलून मापून शब्द वापरावे असा सल्ला त्यांनी दिला होता. पण आज याच गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि खासदार जाधवांना पक्षातूनच आव्हान उभे केले आहे.

गायकवाड यांनी भरलेला लोकसभा निवडणुकीचा अर्ज ही बंडखोरी आहे की पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या पाठिंब्यावर खेळलेली खेळी आहे हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात