नवी दिल्ली : आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून यात ते लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
यंदाची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे.
दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये तयारी सुरू झाली असून पक्षांनी उमेदवाऱ्यांच्या याद्याही तयार केल्या आहेत. भाजपविरोधात इंडिया आघाडी कंबर कसून तयार आहे, तर भाजप आपण तिसऱ्यांदा जिंकून येऊ या विश्वासावर ठाम आहेत. त्यामुळे जनता कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १० मार्चला निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली होती. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान मतदान पार पडलं होतं. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झालं होतं तर २७ मे रोजी मतमोजणी झाली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ५४२ जागांपैकी भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या. भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा चमत्कार सलग दुसऱ्यांदा करून दाखवला होता.