मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा केली. मविआतील जागावाटपाचा तिढा हा दोन जागांवर अडल्याचं सांगण्यात येतंय.
कोणत्या दोन जागांवर तिढा कायम
रामटेक आणि सांगली या दोन लोकसभा मतदारसंघांवरुन महाविकास आघाडीचा पेच कायम असल्याचं सांगण्यात येतंय. सांगली आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस असल्याचं सांगण्यात येतंय. या दोन जागांबाबत काल चर्चा झआली मात्र त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.
सांगलीवरुन नेमका काय तिढा
सांगली हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला होता. गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघात भाजपाचे संजय काका पाटील हे निवडून येतायेत. या मतदारसंघातून दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे तयारीत आहेत. त्यांना तिकिट द्यावे, यासाठी विश्वजीत कदम आग्रही आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्यामुळं प. महाराष्ट्रातील सांगलीची जागा मिळावी यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळं चंद्रहर पाटील हे शिवसेनेकडून निवडणूक लढवतील असं सांगण्यात येतंय. तर वंचित बहुजन आघाडीही या मतदारसंघासाठी प्रयत्नशील असल्याचं मानण्यात येतंय. तूर्तास तरी हा तिढा काँग्रेस विरुद्ध ठाकरे सेना असाच असल्याची माहिती आहे.
रामटेकमध्ये नेमका काय वाद
तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दावा करताना दिसतायेत. तर वंचित बहुजन आघाडीचीही हा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी आहे.
हेही वाचाःमविआची जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात, वंचितला सांगितला आकडा; आता बॉल आंबेडकरांच्या कोर्टात