धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील जागा मविआकडून काँग्रेसला सोडण्यात आली आहे. मात्र अद्याप काँग्रेसला येथून चांगला उमेदवार मिळू शकलेला नाही. प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने एका नेत्याची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यांची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रघुवंशी घराण्याचं मोठं नाव असून यानिमित्ताने धुळे मतदारसंघाबरोबरच नंदूरबार आणि जळगाव मतदारसंघांवरही काँग्रेसची पकड मजबूत होऊ शकेल.
चंद्रकांत रघुवंशी सध्या शिंदे गटात आहेत. येत्या दोन दिवसात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि धुळे लोकसभा मतदारसंघांच्या रिंगणात उतरतील अशी माहिती आहे. एकीकडे रघुवंशींसाठी प्रयत्न सुरू असताना श्याम सनेर (धुळे) आणि डॉ. तुषार शेवाळे (मालेगाव) या व्यतिरिक्त नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभाताई बच्छाव यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे.
भारतीय जनता पक्षाने (BJP) धुळे मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. भामरे यांनी आपला प्रचारदेखील सुरू केला आहे. मात्र, त्यांना सर्वत्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. वंचित बहुजन आघाडीनेदेखील निवृत्त पोलिस अधिकारी अब्दुल रहमान यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
चंद्रकांत रघुवंशींची घरवापसी काँग्रेससाठी फायद्याची…
चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसमध्ये असताना नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद, एकत्रित धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून ते विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. तब्बल २० वर्षे त्यांनी काँग्रेसच्यावतीने नंदूरबारची धुरा सांभाळली आहे. चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील बटेसिंह रघुवंशी हे तीनवेळा काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. चंद्रकांत रघुवंशी यांनी २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाणं पसंत केलं. रघुवंशी यांचं घराणं मोठं असून त्यांचे नंदूरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यात चांगले वर्चस्व आहे. दुसरीकडे नंदूरबारच्या खासदार आणि लोकसभेच्या उमेदवार हिना गावित यांच्यासोबत चंद्राकांत रघुवंशीचे मतभेद असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी जर धुळे लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले तर काँग्रेस परिणामी महाविकास आघाडीला फायद्याचं ठरू शकतं.