मुंबई– भिवंडी आणि सांगली मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि मविआतील इतर दोन घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. सांगलीची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलीय. या मतादरसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही, ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवारांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जाहीर केलीय. यामुळं काँग्रेसमधील वरिष्ठ नेते संतापलेले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे या दोन्ही मतदारसंघांचा आग्रह पोहचवण्यात आलेला आहे. या सगळ्यात टीकेचं धनी होण्याची वेळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आलीय. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीही नाना पटोलेंना लक्ष्य केलंय. अशात मविआतील इतर दोन पक्षांकडून होत असलेल्या विरोधामुळं नाना पटोले संतापलेले असतानाच, भाजपानं त्यांना डिवचलेलं दिसंतय.
व्यथा नानाची, आशिष शेलारांची कविता
आशिष शेलार गेल्या काही दिवसांपासून सद्य राजकीय स्थितीवर विडंबन करणाऱ्या वकिवा एक्स पोस्ट करतायेत.
आज त्यांनी नाना पटोलेंवर टीका करणारी कविता एक्स पोस्ट केलीय.
काय आहे कविता?
व्यथा..”ना..ना” ची
आमचे या आघाडीत “पायपूसणे” व्हावे ?
जो येतो त्याने रोज लाथा घालून जावे ?
होतो भाजपात मी माननीय नानाभाऊ
काँग्रेस मध्ये परत येताच लाथांचे मार खावे?
हे कुठले गावगुंड काँग्रेसने घेतले कडेवर ?
ज्यांनी पाठीत आमच्या खंजीराचे वार द्यावे
कुठला हा बांडगूळ अहंकारी गट उबाठा
लटकून आमच्या फांदीवर आमचेच रक्त प्यावे?
या ढोंग्यांना आम्ही निपटले असते केव्हाच
काय सांगू ? आमच्या पक्षातील आडवे येतात डावे
देवेंद्रभाऊ, नाही सांगता येत, नाही सहन ही होत
आम्ही इथे “पायपूसणे” होऊन किती दिवस रहावे?
पटोले काय प्रत्युत्तर देणार?
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघही काँग्रेसच्या हातातून गेल्यानंतर संजय निरुपम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. तर सांगली, भिवंडीचा वाद अद्याप सुरु आहे. दुसरीकडे या दोन्ही मतदारसंघांत मविआचा प्रचारही सुरु झालाय. यात काँग्रेसची ठाकरे आणि शरद पवारांनी कोंडी केल्याचं स्पष्ट दिसतंय. आता या सगळ्या प्रकाराला आणि शेलार यांच्या टीकेला नाना पटोले कसं उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाः‘…फडणवीस घोषणा करतात, तर शिंदे काय करतात?’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका