ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी ब्रॅण्डचा करिष्मा , मात्र इलेक्टोरल मेरिटची वानवा

उमेदवार निवडीसाठी भाजपची दमछाक

X: @therajkaran

इलेक्टोरल मेरिट या एकमेव निकषावर भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार महाराष्ट्रात ठरणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडण्याचे ऑपरेशन लोटस राज्यात केल्यानंतरही , केवळ मोदी ब्रँडच्या करीष्म्यावर हमखास विजयी होणारे उमेदवार भाजपला काही मतदारसंघात मिळत नाहीयेत हे स्पष्ट होत चालल्याने इतर पक्षातल्या उमेदवारांची आयात करण्याची वेळ भाजपवर आली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आहे , पण निवडून येतीलच याची खात्री नाही असे अनेक उमेदवारांबाबतचे रिपोर्ट मिळाल्याने निवड करताना भाजपची दमछाक होत आहे.

मतदारसंघातील नाराजीचे रिपोर्ट जर दिल्ली दरबारी मिळाले असतील तर कुठल्याही “ब्लु आईड बॉय अथवा गर्ल” ला उमेदवारी दिली जाणार नसून त्यांचा पत्ता निश्चितपणे कापला जाईल असा स्पष्ट आणि कठोर संदेश दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या मुंबईतील बौध्दिकामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे ,फडणवीस व अजितदादा यांना दिला आहे. पण अब की बार चार सौ पार हे टार्गेट गाठायचे असल्याने , पत्ता कापायचा झाल्यास त्याच क्षमतेचा उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान भाजप समोर आहे.

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे ऐंशी वर्षीय वयोवृद्ध खासदार गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यास भाजपने नकार दिल्याची चर्चा आहे.महाविकास आघाडीकडून गजाभाऊंचे सुपूत्र आणि आदित्य ठाकरे यांचे घनिष्ट अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

निवडणुकीच्या रणांगणात पुत्रप्रेम आड येऊन दगाफटका होऊ शकतो , शिवाय गजाभाऊंचे वय देखील लक्षात घेता ही जागा शिवसेनेकडून भाजपला मिळावी आणि बापलेकाच्या नातेसंबंधांचा फटका महायुतीला बसू नये असा सुज्ञ विचार शिवसेना भाजप मध्ये सुरू असल्याचे समजते. ही जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सोडल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ उत्तर भारतीय नेते माजी खासदार संजय निरुपम प्रचंड नाराज आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवसेना खासदार म्हणून भाजपसेना युतीत काम केलेले आहेच. त्यामुळे याचा फायदा घेत , नाराजीच्या कारणाने भाजपच्या वाटेवर असलेले संजय निरुपम येथून भाजपचे उमेदवार होऊ शकतात.

शिवाय या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांचा असलेला मोठा टक्का निरुपम आणि भाजपच्या पथ्यावर पडू शकतो. नातेसंबंधांचा धोका पत्करायचा नाहीच हे सूत्र रावेरला देखील लागू होऊ शकते. येथे नाथाभाऊ खडसे यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे विद्यमान खासदार आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचा कितीही डंका पिटला तरी जातीच्या समीकरणाशिवाय कुठल्याही पक्षाचे निवडणुकीचे राजकारण पूर्ण होत नाही हेच खरे असल्याने रक्षा खडसे यांच्या सारखाच आणि महत्त्वाचे म्हणजे लेवा पाटील समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराचा शोध भाजप घेत आहे. माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांचे नाव सध्या भाजपकडून चर्चेत आहे.

काँग्रेस ने पूर्वापार देशभर वापरलेली साम दाम दंड भेद ही नीती आता भाजपही बेधडकपणे वापरायला लागला आहे. वाजपेयी अडवाणी यांची साधनशुचिता जपणारा भाजप २०१४ पासूनच नवविचारांचा झाला आहे. “संस्था वाचवा, कारवाई टाळा” या त्रिसूत्री वरच भाजपचे सध्याचे राजकारण सुरू असल्याचा बोलबाला त्यामुळेच संपूर्ण देशभर भाजपाबाबत सुरू आहे. याचा परिणाम म्हणूनच परंपरागत असणारी काँग्रेससह अनेक पक्षांची घराणी ही भाजपच्या वळचणीला गेलेली, जात असलेली आपल्याला बघायला मिळतात.

धैर्यशील मोहिते पाटील , गणेश नाईक , रामशेठ ठाकूर अशी अनेक नावे यामध्ये घेता येतील. सांगली येथे संजयकाका पाटील , धुळ्यात डॉ सुभाष भामरे, तर गडचिरोली चिमूर मध्ये अशोक नेते हे सध्या विद्यमान खासदार आहेत. यातील सांगली व धुळ्यात काँग्रेसची निष्ठावान घराणी म्हणजे डॉ पतंगराव कदम आणि रोहिदास पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र काही महिन्यांपूर्वी रोहिदास पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांच्या संस्थावर अनेक धाडी पडल्या होत्या. या ससेमिऱ्यातून सुटायचे , संस्था वाढवायच्या , वाचवायच्या आणि विकासाच्या नावाने राजकारण करायचे तर सत्ताधारी पक्षाचे बाशिंग बांधावेच लागते हे या घराण्यातील तरुण पिढीने ओळखले आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी यासाठी मोठाच “आदर्श” निर्माण केला असल्याने विश्वजीत कदम व कुणाल पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास सांगली व धुळ्यात भाजपला काँग्रेसकडून आयात केलेला उमेदवार द्यावा लागणार आहे.

प्रत्येक अधिवेशनात आणि बाहेरही महायुती विरोधात सातत्याने बोलत असणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या नेहमीच येत असतात. त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी वडेट्टीवारच भाजपमध्ये प्रवेश करत विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या ऐवजी गडचिरोली चिमूर ची उमेदवारी मिळवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. येणाऱ्या काही दिवसांतच हे चित्र स्पष्ट होणार असून घोडमैदान जवळच आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे