नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. पुणे, पशअचिम महाराष्ट्र, मुंबईतील मतदारसंघांच्या भेटीनंतर ते आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली यांच्यासह काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. नाशिकमध्ये दौऱ्याची सुरुवात काळाराम मंदिरातून करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीत काळा राम पावणार का, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. काही वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेवर मनसेचं एकहाती वर्चस्व होतं. मात्र नंतरच्या काळात पक्षातील गटबाजीनं तोंड वर काढलेलं आहे. अशात लोकसभा निविडणुकीच्या निमित्तानं या मतादरसंघातून उमेदवार जाहीर करुन, पुन्हा एकदा पक्ष संघटना बळकट होणार का, याकडं सगळ्याचं लक्ष असेल.
यापूर्वी मोदी-ठाकरेंचंही काळाराम दर्शन
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी १२ जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधानांनी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात येऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं होतं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान काळाराम मंदिरात दर्शनाला आल्यानं त्यावेळी राजकारणही रंगलं होतं. रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब काळारामाचं दर्शन घेत आरती केली होती. त्यानंतर गोदावरी तिरावर आरतीतही ते सहभागी झाले होते.
तपोभूमीला का आलं महत्त्व
नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या वनवासाच्या काळात वास्तव्यास होते. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्र्तिष्ठेच्या निमित्तानं नाशिकच्या या तपोभूमीलाही राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय.
देशात सध्या हिंदुत्वाची लाट आहे, या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न भाजपासोबत सगळ्यात राजकीय पक्षांककडून होताना दिसतोय. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाही समावेश आहे.