नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाज माध्यामावरुन एक घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा अनेकांना रुचली नाही आणि त्यावर विरोधातील प्रतिक्रिया येत असल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनी एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. नारी शक्तीसाठी हा निर्णय फायद्याचा राहिल असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वयंपाकाचा गॅस अधिक स्वस्त देऊन आम्ही कुटुंबाच्या कल्याणाचे आणि निरोगी वातावरणाची खात्री करण्याचे ध्येय ठेवतो. या निर्णयाच्या माध्यमातून स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी असलेली आमची बांधिलकी दिसते. याशिवाय त्यांचं जीवन सुलभ असावं हादेखील आमचा प्रयत्न आहे.
मात्र त्यांच्या या घोषणेवर अनेक विरोधातील प्रतिक्रिया येत आहेत. महिलांना कायम स्वयंपाकघराशी जोडणं योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहे.
एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले तर ते वृत्त घरातील गृहिणींशी जोडले जाते. मात्र प्रत्यक्षात ही असमानता असल्याची भावना समाज माध्यमांतून व्यक्त केली जात आहे.