मुंबई : आजही राजकारणात महिलांचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचा दिसून येतो. त्यातही सक्रिय राजकारणात तरुण महिलांची संख्या खूपच कमी असल्याची ओरड नेहमीच केली जाते. मात्र हे तीन तरुण-तडफदार चेहरे आगामी राजकारण गाजवू शकतात. अशाच तरुण महिलांचा घेतलेला आढावा…
विजय वडेट्टीवारांची लेक शिवानी वडेट्टीवार…
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यादरम्यान काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार निवडणुकीच्या रणांगणात उतरू शकते.
2019 मध्ये शिवानी यांनी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून निवडणूक लढवली होती. 2020 पर्यंत त्या पक्षात प्रदेश सचिव पदापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी बढती देण्यात आली. सध्या, शिवानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून काम करतात. जिथे त्या निवडणूक तयारी समिती हाताळतात. शिवानी यांनी मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेजमधून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये पदवी मिळवली आहे.
बाळासाहेब थोरातांची लेक जयश्री थोरात…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी डॉ. जयश्री थोरात सक्रीय राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री यांना संगमनेर युवक अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरातांनंतर आता डॉ. जयश्री थोरात ही तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.
जयश्री थोरात या कॅन्सरतज्ज्ञ असून एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहेत.
अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण…
श्रीजया चव्हाण या नांदेडमधील भोकर विधानसभेतून मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. श्रीजया चव्हाण या गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणात दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये असताना श्रीजया चव्हाण यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्याच्या काही दिवसांनी श्रीजया चव्हाण भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकले होते.
श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या द्वितीय कन्या आहेत. श्रीजया यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. श्रीजय यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईत गेलं. त्या २०१९ मध्ये लोकसभेच्या प्रचारात उतरल्या होत्या. आजपर्यंत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी आगामी विधानसभेत त्या भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.