मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . या निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan graduates constituency) अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करुन भाजपला धक्का दिला आहे. आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघावर दावा करत दंड थोपटले आहेत. आपणही या जागेवरुन निवडणूक लढवलीच पाहिजे आणि लढणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सह्याद्रीवर बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दोन दिवसांत चारही जागांवर महायुतीकडून नावांची घोषणा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मनसेने उमदेवार जाहीर केला असून त्यांच्या उमेदवाराला महायुती पाठींबा देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, आता राज ठाकरे यांनी याठिकाणी उमेदवार उभा करून भाजपची चांगलीच अडचण केली आहे. भाजपसाठी राज ठाकरे महत्त्वाचे असल्याने आता त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला कशी सांगायची, हा प्रश्न भाजप नेत्यांपुढे आहे.
अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाने लढावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी आग्रही भूमिका घेतली. आता यावर अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 31 मे पासून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे .