नगर- नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत यापूर्वीच प्रवेश केलाय. त्यांना शरद पवारांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आधीच महायुतीची ताकद कमी झाल्याचं मानण्यात येतंय. त्यातच सुज विखे पाटील यांच्या उमेदवारीला आता भाजपातूनच विरोध होताना दिसतो आहे.
पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
नगर जिल्ह्यातील राजकारण हे अनेक प्रस्थापितांचं राजकारण असल्याचं मानण्यात येतं. या निवडणुकीतही विके पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशीच लढत होण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांना भाजपातून नाराज पदाधिकाऱ्यांची साथ असल्याचं सांगण्यात येतंय.
शेवगावमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुजय विखे यांच्या उमेदवारीला विरोध करत बंडाचं निशाण हाती घेतलेलं आहे. सुनील रराने यांनी या नाराजीचं पत्रच भाजपाच्या वरिष्ठांना लिहिलेलं आहे. त्यात विखे पाटील गेल्या वेळी निवडून आल्यानंतर मतदारांशी संपर्क तुटल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. शेवगावात पाणी, रस्ते, वैद्यकीय सेवा यासारख्या विषयांकडे विखे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळं १०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात भाजपाच्या शुद्धीकरणासाठी काम करत राहू, असाही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे.