मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत केली होती, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी शेलारांवर टीका केली आहे.
क्रास्टो म्हणाले, आशिष शेलारांचे दावे आणि आरोप पूर्णपणे निराधार आणि असत्य आहेत. शिवाय आशिष शेलारांच्या निवडक स्मृतिभ्रंश आहे. कारण त्यांचा पक्ष भाजप हा २५ वर्षे शिवसेनेसोबत युतीत होता. अशावेळी सोयीस्करपणे शेलारांना याचा विसर पडत आहे.
पुढे बोलताना क्रास्टो यांनी शेलार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचाही आरोप केला. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे नगरविकास मंत्री होते आणि बीएमसी त्यांच्या खात्याअंतर्गत होती. त्यामुळे शिंदे गट यांच्याशी युती असूनही, शेलार हे आरोप का करत आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आशिष शेलार चौकशीची मागणी करत असतील, तर भाजपच्या सर्व नगरसेवकांवर आणि भाजपशी संलग्न असलेल्यांवरही अशीच चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असंही क्रास्टो यावेळी म्हणाले.
त्यामुळे शेलारांनी केलेल्या मागणीनुसार, मुंबईच्या पाण्याची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात येणार का, आणि याबरोबरच त्यावेळी युतीत असलेल्या भाजप नगरसेवकांचीही चौकशी होणार का, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.