मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक सुजाता आनंदन यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आणि मनाला चटका लावून गेले. सुजाता आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणा-या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुजाता आनंदन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, सुजाता आनंदन यांनी नागपूर विद्यापीठातून बीएससी आणि बॅचलर ऑफ जर्नलिझमचे शिक्षण घेऊन १९८५ पासून पत्रकारितेची सुरूवात ‘यूएनआय’ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून केली. त्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’ ‘आउटलूक’ साप्ताहिक, ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये त्यांनी काम केले.
सध्या त्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीच्या निवासी संपादक म्हणून काम पहात होत्या. सुजाता आनंदन यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय व बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर विपुल लिखाण केले आहे. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिक आणि डिजिटल पोर्टलसाठी काम केले. सुजाता आनंदन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.