मुंबई: बालकांचा वापर संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, मद्यविक्री किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांमध्ये बालकांचा वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गुन्हेगारी टोळ्या बालकांना पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांचा बुद्धीभेद करून अमली पदार्थांची विक्री, मद्यविक्री आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याबरोबरच बालगुन्हेगाराची वयोमर्यादा १६ वर्षे करण्याची मागणीही त्यांनी केली.
उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यमान कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा काही गुन्हेगार घेत आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बालगुन्हेगारीविरोधातील कायदा अधिक कठोर करण्याचा गंभीरपणे विचार केला जाईल.
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काही गंभीर गुन्ह्यांमध्ये १६ वर्षांवरील बालकांचा विचार वेगळ्या निकषांनुसार केला जातो. मात्र राज्यस्तरावर बालगुन्हेगाराची वयोमर्यादा १६ वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे केंद्र सरकारकडे राज्याची भूमिका मांडली जाईल.
ऑर्केस्ट्रा बारांवरील कारवाई सुरूच
याच प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारांबाबत प्रश्न उपस्थित केला.
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ध्वनीमुद्रित संगीतासह नृत्य सादर करण्यासाठी एकही नवीन परवाना देण्यात आलेला नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक ऑर्केस्ट्रा बारांवर जानेवारी २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीत १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कायद्यातील पळवाटा शोधून काहीजण नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतात. “चोर आणि पोलीस यांची लढाई पूर्वापार सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणार,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांची कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला.

