मुंबई : धुळे लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा भाकरी फिरवणार हे स्पष्ट आहे. दोन टर्म खासदार राहिलेले सुभाष भामरे यांना भाजपा यावेळी पुन्हा तिकिट देणार नाही. त्यांच्याऐवजी भाजपात अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातही धरती देवरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र भाजपा ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवार आयात कारणाचे संकेत मिळतायत. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांना भाजपात घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी खात्रीलायक माहिती आहे.
कोण आहेत कुणाल पाटील…
कुणाल रोहिदास पाटील धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसकडून तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले होते. कुणाल पाटील यांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत धुळे तालुक्यातील खोलीकरण, दुरुस्ती, दोन नद्यांचे पुनरुज्जीवन, पांझरा नदीवरील ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन केले. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूर उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
तर महायुतीतही उमेदवारीवरून संभ्रम आहे. ही जागा काँग्रेसची असली तरी यावेळी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. ठाकरेंकडून आमदार शरद पाटील यांना उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती आहे.
कोण आहेत शरद पाटील?
धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. शरद पाटील याआधीही शिवसेनेत होते. मात्र त्यावेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद पाटील उद्धव ठाकरेंसोबत राहिले.
धुळे मतदारसंघात मराठा मतं मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळं पाटील विरुद्ध पाटील असा संघर्ष धुळे लोकसभा मतदारसंघात पाहता येणार आहे.