X: @therajkaran
मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याच्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या (Thackeray) शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील साळवे यांना आमच्या निकालपत्रात जे निर्देश देण्यात आले आहेत, त्याविरोधात निर्णय झाला आहे का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘खरी शिवसेना’ विधानसभेतील बहुमतावर ठरवणे हे आमच्या निर्णयाविरोधात नाही का?’ असा सवाल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, आज हे प्रकरण उच्च न्यायालयात चालावं की सर्वोच्च न्यायालयात यावर ८ एप्रिल रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे वकील साळवे म्हणाले की, ठाकरे गटाने जी कागदपत्रे सादर केली आहेत ती बनावट आहेत. आपली नेमणूक करायला उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव कोणी मांडला हे विचारात घ्यायला हवे. तसेच हा प्रस्ताव मांडला जाताना ते स्वत: हजर नव्हते, असे अनेकांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी एकनाथ शिंदे गटाला १ एप्रिल किंवा त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीची मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत
दरम्यान शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, लता सोनावणे, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यासाठी याचिकाही दाखल केली होती. याबाबत निकाल देताना एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते.यावरही ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.