पुणे
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दमदार विजय मिळवणाऱ्या रवींद्र धंगेकरांना राम पावणार, असंच काहीसं चित्र आहे. काँग्रेसच्या तिकीटावर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सिक्सर मारणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची ओळख आपला माणूस म्हणून केली जाते. मार्च २०२३ च्या निवडणुकीत २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव केला होता.
कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, तेथे विजय मिळवणं सोपं नव्हतं. मात्र धंगेकरांचा ग्राऊंड कनेक्ट इतका तुफानी होता की, त्यांनी विजयाचा षटकार मारला.
अवघ्या एक वर्षाच्या आमदारकीनंतर आता त्यांना भाजपकडून खासदारकीची ऑफर असल्याची चर्चा आहे. पुणे लोकसभेत भाजपकडे अपेक्षित चांगला चेहरा नसल्याने ते धंगेकरांना लोकसभेचं तिकीट देऊन भाजपकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देत असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने कामही सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे लोकसभेत सध्या भाजपकडून सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र धंगेकरांचा पुण्यातील करिष्मा पाहता भाजप त्यांना लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. असं झालं तर धंगेकरांसाठीही ही मोठी संधी असेल. मात्र धंगेकर काँग्रेस सोडून भाजपची वाट धरणार का, हे येत्या काही दिवसात समोर येईल.
२०१९ ला पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट 6,31,875 मते मिळवून विजयी झाले होते. मात्र २९ मार्च २०२३ रोजी पदावर असताना त्यांचं निधन झालं. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे अनिल शिरोळे 5,69,535 मते मिळवून विजयी झाले होते.