X: @NalawadeAnant
मुंबई: भाजप सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश असून विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठीच ते ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहेत. पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुका (Lok Sabah elections 2024) दोन महिन्यात होत आहे, यासाठी काँग्रेस पक्ष सर्व ताकदीने मैदानात उतरणार असून राज्यातील सहा विभागात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर, ब्लॉक स्तरावरही बैठका घेऊन पक्ष संघटनेच्या तयाराची आढावा घेतला जाणार आहे. देशपातळीवर भाजपा विरोधी पक्षांची इंडिया आघाडी (INDIA alliance) काम करत असून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सुरु आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून जागा वाटपावरही चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झालेली आहे, लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ३० टक्के मिळाली होती म्हणजे ७० टक्के मते विरोधात होती. त्यामुळे भाजप (BJP) विरोधात जर सर्व पक्ष एकत्र आले तर पराभव करणे शक्य आहे. म्हणूनच या सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार विजयी करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राम मंदिरासंदर्भात (Ram Mandir) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेमश चेन्नीथला म्हणाले की, मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे, अशा अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांनी हेच म्हटले आहे, ते सुद्धा या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काँग्रेसला निमंत्रण होते. पण हा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी आहे व अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य असल्याचे चेन्नीथला यांनी नमूद केले.
Also Read: ‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास….!