सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात पक्षाचा आदेश फेटाळून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
काल 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. तरीही त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत 25 एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर येत्या 25 एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असून यासाठी त्यांना लिफाफा चिन्ह मिळाले आहे. आमच्याविरोधात दंडूकशाही करणाऱ्या संजयकाका पाटील यांच्याविरोधात असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. काल पत्रकार परिषद घेत विशाल पाटील यांनी काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त केली.
सांगलीत ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे यंदा सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.